सिरोंचा : अवैध दारू निर्मिती, साठवणूक व विक्रीविरोधात असरअल्ली पोलिसांनी धडक कारवाई करत नडीकुडा परिसरात दोन स्वतंत्र कारवाया केल्या. या कारवाईत तब्बल ६,५०० लिटर गुळामोहाचा सडवा, अंदाजे २ लाख २७ हजार ५०० रुपये किमतीचा, जप्त करण्यात आला.दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी मौजा नडीकुडा येथे करण्यात आलेल्या पहिल्या कारवाईत मोंडी हेडीमलु गज्जेला (वय ४७, रा. नडीकुडा) याच्याकडून ५,००० लिटर गुळामोहाचा सडवा जप्त करण्यात आला. याप्रकरणी असरअल्ली पोलीस ठाण्यात अप. क्र. ९८/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५(फ)(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर दुसऱ्या कारवाईत प्रविण सारली माडेम (वय ३०, रा. नडीकुडा) याच्याकडून १,५०० लिटर गुळामोहाचा सडवा जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध अप. क्र. ९९/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५(फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.ही कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, सिरोंचा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सपोनि युवराज घोडके, प्रभारी अधिकारी, पोलीस ठाणे असरअल्ली यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी ही कारवाई केली.अवैध दारू निर्मिती, साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा असरअल्ली पोलिसांनी दिला आहे.







