प्रतिनिधी सागर मूलकला सिरोंचा
सिरोंचा : सिरोंचा–आसरअली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ वरील आरडा-वढण परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत अजगराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रात्रीच्या सुमारास रस्ता ओलांडताना अजगर अज्ञात वाहनाखाली आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.अजगर रस्त्यावर मृतावस्थेत पडून असल्याने तो पाहण्यासाठी ये-जा करणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होत होती. त्यामुळे महामार्गावर काही काळ वाहनचालक व प्रवाशांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते.घटनेची माहिती मिळताच सिरोंचा वनक्षेत्रातील क्षेत्रसहायक अरविंद रोहिले, वनरक्षक ज्ञानेश्वर बोगा तसेच चौकीदार सतीश नासानी यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अजगराची पाहणी करून घटनास्थळाची माहिती घेतली आणि वन विभागाच्या नियमानुसार आवश्यक कार्यवाही केली.वन्यजीवांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी रात्रीच्या वेळी विशेष काळजी घेऊन वाहनांचा वेग नियंत्रित ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.







