* सिरोंचा : तालुक्यातील गुमलकोंडा येथील विनीत व्यंकटी लाटकरी (वय २५) यांचा मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. महादेवपूर येथील पेट्रोल पंपाजवळ रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकला त्यांच्या दुचाकीची धडक झाल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.विनीत लाटकरी हे मागील तीन वर्षांपासून हैदराबाद येथील एका खासगी कंपनीत कार्यरत होते. कामानिमित्त हैदराबाद येथे वास्तव्यास असलेले विनीत हे मोटारसायकलने आपल्या गावी गुमलकोंडा येथे येत असताना महादेवपूर पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकीची रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकसोबत धडक झाली.अपघाताची धडक इतकी भीषण होती की, विनीत यांचा जागीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीनुसार सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. या घटनेप्रकरणी संबंधित पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.विनीत यांच्या आकस्मिक निधनाने गुमलकोंडा गावावर शोककळा पसरली असून, कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात दोन वर्षांची मुलगी असल्याने कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे.
*मूलकला फाऊंडेशनचा मदतीचा हात*
या दुर्दैवी घटनेनंतर तिसऱ्या दिवशी सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असलेल्या मूलकला फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर मूलकला यांनी गुमलकोंडा येथे जाऊन विनीत लाटकरी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करून दुःखात सहभागी असल्याचे सांगितले.विनीत यांच्या कुटुंबीयांना मूलकला फाऊंडेशनच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली. या प्रसंगी गावकरी व नातेवाईक उपस्थित होते. संकटकाळात कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहून मदतीचा हात दिल्याबद्दल सागर मूलकला यांच्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.







