*शांतता, सामाजिक उपक्रम व सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे पोलिसांचे आवाहन*
प्रतिनिधी सागर मुलकला, सिरोंचा
सिरोंचा : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिरोंचा पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा राखून साजरा करण्याबाबत या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले.या बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी हर्षवर्धन बी. जे., उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा समाधान पाटील, पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुधाळ, नायब तहसीलदार पारधी तसेच महावितरण विभागाचे अभियंता कांकाल यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुधाळ यांनी सांगितले की, येत्या १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. गणेश मंडळांनी उत्सव काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. तसेच केवळ मनोरंजनात्मक कार्यक्रमांपेक्षा सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देऊन गरीब व गरजू नागरिकांना मदत करणारे उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले.उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील यांनी गणेशोत्सव काळात शांतता व सुरक्षितता राखण्यावर भर दिला. डीजेचा वापर टाळून शासनाच्या नियमांचे पालन करावे, गणेश मंडळांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले. पोलिसांकडून गणेश मंडळांना दररोज भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.गणेश विसर्जनाच्या वेळी वाहनांचा वापर करताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी, कोणतीही दुर्घटना होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना वाहतुकीमुळे त्रास होणार नाही, याची मंडळांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले. लोकप्रतिनिधी, गणेश मंडळे व नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.अप्पर पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बी. जे. अहेरी यांनी बोलत गणेशोत्सव व आगामी नवरात्रोत्सवाच्या काळात परिसर नशामुक्त करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. सामाजिक उपक्रम राबवून आदर्श गणेश मंडळ म्हणून काम करण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक गणेश मंडळासाठी एक पोलीस अंमलदार नियुक्त करून मंडळाशी समन्वय ठेवण्यात येणार असून, मंडळांना पोलिसांकडून आवश्यक सहकार्य केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. “आम्ही आपल्या सेवेसाठी आहोत; पोलिसांना सहकार्य करा,” असे आवाहनही त्यांनी केले.बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस उपनिरीक्षक, महिला पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.या शांतता समिती बैठकीला सिरोंचा तालुक्यातील पोलीस पाटील, नगरसेवक, युवक, गणेश मंडळांचे पदाधिकारी व पत्रकार बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.






