प्रतिनिधी – सागर मूलकला सिरोंचा
सिरोंचा : सिरोंचा–आसरअली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ वर इंदिरानगर गावाजवळ महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून मोठे खड्डे पडल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालक व प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. विशेषतः रात्रीच्या वेळी या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता.सिरोंचा–आसरअली हा मार्ग छत्तीसगड राज्याला जोडणारा महत्त्वाचा महामार्ग असून, या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मागील वर्षीही याच मार्गावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे भविष्यात पुन्हा अपघात होऊन जीवितहानी होऊ नये, या सामाजिक भावनेतून सिरोंचातील इंजिनिअर तथा सामाजिक कार्यकर्ते राहुल मारगोनी यांनी पुढाकार घेतला.मारगोनी यांनी स्वतःच्या जेसीबीच्या सहाय्याने महामार्गावरील खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून ते बुजविले. कोणत्याही शासकीय यंत्रणेची वाट न पाहता सामाजिक बांधिलकीतून त्यांनी केलेल्या या कामामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल प्रवासी, वाहनचालक तसेच परिसरातील नागरिकांनी राहुल मारगोनी यांचे आभार मानले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते किरण वेमुला यांच्यासह गावकरी व प्रवासी उपस्थित होते.महामार्गाची कायमस्वरूपी दुरुस्ती करून रस्त्याची सुरक्षितता वाढवावी, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.







