शेतकरी रवी कोत्तापल्ली यांनी पारंपरिक पद्धतीने बैलांची पूजा करून साजरा केला पोळा
प्रतिनिधी – सागर मुलकला, सिरोंचा
सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील कोत्तापल्ली गावात शेतकऱ्यांचा पारंपरिक आणि महत्त्वाचा सण असलेला बैल पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शेतकरी रवी कोत्तापल्ली यांनी आपल्या बैलांना सजवून त्यांची विधिवत पूजा केली.पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर बैलांना स्वच्छ धुऊन, आकर्षक सजावट करण्यात आली. त्यांच्या अंगावर रंगीबेरंगी झूल, गोंडे व विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तू लावण्यात आल्या. त्यानंतर बैलांची पूजा करून त्यांना नैवेद्य अर्पण करण्यात आला.शेतीच्या कामात वर्षभर शेतकऱ्यांना साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा या सणातून जपली जाते. ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात. कोत्तापल्ली गावातही पारंपरिक पद्धतीने पोळा साजरा झाल्याने उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.शेतकरी रवी कोत्तापल्ली यांच्या या उपक्रमातून ग्रामीण संस्कृती, कृषी परंपरा आणि पशुधनाप्रती असलेली कृतज्ञता अधोरेखित झाली.







