प्रतिनिधी सागर मूलकला सिरोंचा
सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील विविध वीज समस्यांबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (MSEDCL) वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. MSEDCLचे मुख्य अभियंता गजीबीये, अधीक्षक अभियंता खंडिलकर व कार्यकारी अभियंता वाघमारे यांनी आज सिरोंचा तालुक्याचा दौरा केला. यावेळी सिरोंचा येथील 33/11 KV उपकेंद्रात त्यांची भेट घेऊन तालुक्यातील वीजपुरवठ्याशी संबंधित विविध प्रश्न मांडण्यात आले.
यावेळी नगरसेवक रंजित गागापुरवार, नगरसेवक इम्तियाज खान, सामाजिक कार्यकर्ते सिद्दिक भाई, सुजल कमलवार, संदीप गंटा व सुजित मदरबोईना यांनी गेल्या दोन-तीन वर्षांपासून रखडलेल्या 132 KV विद्युत उपकेंद्राच्या कामाला तातडीने गती देऊन प्रकल्प लवकर पूर्ण करण्याची मागणी केली.
सिरोंचा तालुक्यातील अनेक भागांत कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने घरगुती ग्राहक, व्यावसायिक तसेच शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः कृषिपंपांवर कमी दाबाच्या वीजपुरवठ्याचा परिणाम होत असून, शेतीच्या कामात अडथळे निर्माण होत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. वीजपुरवठा अधिक सक्षम व सुरळीत करण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
याशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याच्या मुद्द्यावरही चर्चा करण्यात आली. स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करू नये, तसेच ग्राहकांच्या शंका व अडचणींचा विचार करूनच याबाबत निर्णय घ्यावा, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
तालुक्यातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, तांत्रिक अडचणी, शेतकऱ्यांना होणारा त्रास आणि विद्युत पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीने विविध प्रश्नांवर अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली. मांडण्यात आलेल्या समस्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीरतेने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
ही चर्चा समाधानकारक झाली असून, सिरोंचा तालुक्यातील वीज समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती नगरसेवक रंजित गागापुरवार यांनी दिली.
«“सिरोंचा तालुक्यातील वीज समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी 132 KV प्रकल्पाचे रखडलेले काम तातडीने मार्गी लागणे अत्यंत आवश्यक आहे. कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सर्व प्रश्न ठामपणे मांडले असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.”
— रंजित गागापुरवार, नगरसेवक, नगरपंचायत सिरोंचा»







