२.५६ लाख रुपये किमतीचे ३६ सागवान नग जप्त; तस्करांमध्ये खळबळ
प्रतिनिधी – सागर मूलकला सिरोंचा
सिरोंचा : आसरआली वन परिक्षेत्रातून सागवान लाकडाची अवैध वाहतूक व साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध वन विभागाने धडक कारवाईचे सत्र सुरूच ठेवले आहे. एकाच आठवड्यात करण्यात आलेल्या दुसऱ्या मोठ्या कारवाईत कोपेला-१ नियतक्षेत्रातून ३६ सागवान नग, एकूण २.१८ घनमीटर लाकूड जप्त करण्यात आले आहे. या लाकडाची अंदाजे किंमत २ लाख ५६ हजार ६२३ रुपये असल्याची माहिती वन विभागाने दिली.गुप्त माहितीच्या आधारे वन विभागाच्या पथकाने कोपेला-१ नियतक्षेत्र परिसरात अचानक कारवाई केली. यावेळी तस्करांनी लपवून ठेवलेला सागवान लाकडाचा साठा आढळून आला. वन पथकाने तत्काळ सर्व ३६ नग ताब्यात घेऊन वन परिक्षेत्र कार्यालयात जमा केले.या प्रकरणी भारतीय वन अधिनियम, १९२७ अंतर्गत वन गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, संबंधित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी शिवाजी आजीनाथ पानगे यांनी दिली.ही कारवाई सिरोंचा वन विभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी व उपविभागीय वनाधिकारी अक्षय मीना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वनपरिक्षेत्राधिकारी शिवाजी आजीनाथ पानगे यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी कारवाई केली.आठवडाभरात सलग दुसरी मोठी कारवाई झाल्याने परिसरातील अवैध सागवान तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. जंगलातील अनधिकृत वृक्षतोड व लाकूड तस्करीला आळा घालण्यासाठी वन विभागाकडून यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.







