सिरोंचा :
सिरोंचा ते आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग क्र. 353-C च्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाचे काम व आर्थिक भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप बहुजन समाज पार्टीचे गडचिरोली जिल्ह्याचे माजी अध्यक्ष शंकर पोचम बोरकूट यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.महामार्गाच्या बांधकामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर असतानाही प्रत्यक्षात अंदाजपत्रकातील निकषांनुसार काम होत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सिरोंचा ते बेजूरपल्ली दरम्यान सुमारे 30 ते 40 किलोमीटर अंतरावर करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यात मुरूमऐवजी निकृष्ट मातीचा वापर, सिमेंटचे कमी प्रमाण तसेच गिट्टीचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप करण्यात आला आहे.रस्त्याची लेव्हल व जाडी योग्य न ठेवल्याने हा महामार्ग उबड-धोबड व धोकादायक बनला असून वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या मार्गावरील लहान-मोठ्या पुलांचे बांधकामही दर्जाहीन असल्याचे नमूद करण्यात आले आहे.कामाच्या ठिकाणी संबंधित अभियंते नियमित उपस्थित राहत नसल्याने कंत्राटदाराकडून मनमानी कारभार सुरू असून प्रत्यक्ष कामापेक्षा अधिक रकमेची बिले व अॅडव्हान्स देण्यात आल्याची माहिती असल्याचा दावाही बोरकूट यांनी केला आहे. या प्रकरणाची क्वालिटी कंट्रोल विभागामार्फत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी व संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा बहुजन समाज पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.






