सिरोंचा तालुका प्रतिनिधी / सागर मूलकला
सिरोंचा : शहरातील बालाजी मंदिर प्रांगणात गोदादेवी कल्याण महोत्सव बुधवारी, दिनांक १४ जानेवारी रोजी अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या धार्मिक सोहळ्यासाठी सिरोंचा तालुक्यासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची गर्दी उसळली होती.
गोदादेवी कल्याण महोत्सवानिमित्त विविध धार्मिक विधी, पूजा-अर्चा व अभिषेकाचे कार्यक्रम पार पडले. बालाजी मंदिराचे पुजारी दसरात महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विधी धार्मिक परंपरेनुसार पार पाडण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसर “जय गोदादेवी माता”च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. भाविकांनी श्रद्धेने देवीचे दर्शन घेत मनोभावे प्रार्थना केली.
या प्रसंगी मंदिर कमिटीच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचे वितरण करण्यात आल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंदिर कमिटीचे पदाधिकारी, स्वयंसेवक व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. गोदादेवी कल्याण महोत्सव शांततेत व भक्तिभावाच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाला.







