सागर मूलकला प्रतिनिधी सिरोंचा
सिरोंचा–तेलंगणा राष्ट्रीय महामार्गावरील धर्मपुरी गावाजवळ तात्काळ स्पीड ब्रेकर बसविण्यात यावेत तसेच सूचना फलक, अपघात सूचक बोर्ड, रिफ्लेक्टर व आवश्यक रस्ते सुरक्षा चिन्हे १० दिवसांच्या आत लावण्यात यावीत, अन्यथा रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नगर पंचायत उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी दिला आहे.या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदने सादर करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. हा तेलंगणा राज्याला जोडणारा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग असून या मार्गावरून दररोज जड व हलक्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते.धर्मपुरी गावाजवळ वेग नियंत्रणासाठी स्पीड ब्रेकर, सूचना फलक, अपघाताचा इशारा देणारे बोर्ड, रिफ्लेक्टर तसेच रोड मार्किंग नसल्यामुळे आतापर्यंत अनेक अपघात घडले आहेत. यामुळे नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला असून भविष्यातील अपघात टाळण्यासाठी सदर ठिकाण तात्काळ ‘अपघातप्रवण क्षेत्र’ म्हणून घोषित करून सर्व आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे.यावेळी सल्लागार राहुल गरपल्लीवार, नागेश दुग्याला, प्रणित मार्गोनी, सतीश येगोलापू, रमेश जक्कावर व प्रशांत पुजलवार यांची उपस्थिती होती







