संपादक / सागर मूलकला सिरोंचा
सिरोंचा तालुक्यातील सुरायपल्ली (आदीमुत्तापुर) येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. कौटुंबिक वादातून मुलानेच आपल्या वडिलांवर हल्ला करून त्यांचा जीव घेतल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकारामुळे नात्यांमधील वाढता तणाव पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.या घटनेत मोंडी मल्लय्या अक्कूदारी (वय ४५ वर्षे, व्यवसाय – मजुरी, रा. आदीमुत्तापुर, ता. सिरोंचा) यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांचा मुलगा सनमुखराव मोंडी अक्कूदारी (वय ३० वर्षे, व्यवसाय – मजुरी) याला सिरोंचा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्राथमिक तपासानुसार, वडील व मुलगा यांच्यात गेल्या काही काळापासून कौटुंबिक कारणांवरून सतत वाद होत होते. या वादांचा तणाव वाढत जाऊन अखेर त्याचे रूप गंभीर हिंसाचारात बदलले. घटनेच्या दिवशी झालेल्या वादानंतर संतप्त झालेल्या मुलाने कशाच्यातरी सहाय्याने वडिलांच्या कपाळावर तसेच डोळ्याच्या डाव्या बाजूला जोरदार वार केल्याचे समोर आले आहे.
या हल्ल्यानंतर मल्लय्या अक्कूदारी यांचे डोके जोरात बाजूला आपटले, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. हल्ल्याची तीव्रता इतकी होती की ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. कुटुंबीयांनी तात्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र जखमा अत्यंत गंभीर असल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सिरोंचा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी सिरोंचा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०९/२०२६ नोंदविण्यात आला असून, आरोपी सनमुखराव मोंडी अक्कूदारी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक निखिल फटिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र वंगाटे यांनी करीत आहेत.
या घटनेमुळे सुरायपल्लीसह परिसरात भीती व शोककळा पसरली असून, “कौटुंबिक तणाव वेळेत हाताळला गेला असता का?” असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. नातेसंबंधांतील वाढता तणाव, संवादाचा अभाव आणि वादाचे योग्य निराकरण न होणे याचे किती भयावह परिणाम होऊ शकतात, याचे हे दुर्दैवी उदाहरण असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.







