सागर मूलकला/सिरोंचा
सिरोंचा : मोयाबीनपेठा :ग्रामपंचायत मोयाबीनपेठा येथे २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ येत्या फेब्रुवारी २०२६ मध्ये संपणार असून, २०२१ ते २०२६ या पाच वर्षांच्या कालावधीत करण्यात आलेल्या कामांचा संपूर्ण हिशोब लोकांसमोर मांडण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.या कालावधीत ग्रामपंचायतीकडून झालेली आवक-जावक, जमा-खर्च तसेच विकासकामांचा सविस्तर लेखाजोखा सात दिवसांच्या आत विशेष ग्रामसभा घेऊन जाहीर करावा, अशी मागणी करत प्रभारी सरपंच व ग्रामपंचायत सचिव यांना निवेदन देण्यात आले. निर्धारित कालावधीत हिशोब सादर न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.सदर आंदोलन व निवेदन देण्याची प्रक्रिया शिवसेना (शिंदे गट) जिल्हा प्रमुख राकेश भाऊ बेलसरे व अहेरी विधानसभा प्रमुख संदीप भाऊ कोरते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच तालुका प्रमुख गणेश भाऊ बोदनवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या संमतीने पुढाकार घेण्यात आला.यावेळी शिवसेना कार्यकर्ते संतोष चंदावार यांच्यासह राजमल्लू मानेम उपस्थित होते. ग्रामपंचायतीने पारदर्शक कारभार करावा व जनतेसमोर सर्व हिशोब मांडावा, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आली.







