सिरोंचा | प्रतिनिधी सागर मूलकला
सिरोंचा शहरातील नागरिकांच्या सुरक्षेस अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने पोलीस स्टेशन सिरोंचा येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज सर्वेलन्स वाहन (MH12ZC303) पोलीस विभागाच्या ताफ्यात दाखल करण्यात आले आहे. या नव्या उपक्रमामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखणे शक्य होणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.या सर्वेलन्स वाहनामध्ये चारही दिशांना उच्च दर्जाचे CCTV कॅमेरे बसविण्यात आले असून शहरातील विविध भागांवर सतत नजर ठेवता येणार आहे. तसेच आधुनिक माईक सिस्टीमच्या माध्यमातून नागरिकांना जनजागृती, सुरक्षा सूचना तसेच आपत्कालीन संदेश त्वरित देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.सन १९०९ मध्ये स्थापन झालेल्या पोलीस स्टेशन सिरोंचा अंतर्गत सुरू करण्यात आलेला हा उपक्रम गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. संशयास्पद हालचालींवर तात्काळ कारवाई करणे तसेच शहरातील शांतता व सुरक्षित वातावरण कायम राखण्यास या वाहनाची मदत होणार आहे.नागरिकांना पोलिसांचे आवाहन कायद्याचे पालन करावे.संशयास्पद हालचालींची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी.सुरक्षित व गुन्हेमुक्त सिरोंचा घडविण्यास सहकार्य करावे.सिरोंचा शहराच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सदैव कटिबद्ध असून “आपली सुरक्षा – आमची जबाबदारी!” हा संदेश उप विभागीय पोलीस अधिकारी संदेश नाईक यांनी देण्यात आला आहे.







