श्री राम सेना यांच्या वतीने भक्तीमय वातावरणाचा आयोजन
अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्याच्या मंगल आणि ऐतिहासिक प्रसंगी, श्री राम सेना यांच्या वतीने आज सिरोंचा शहरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या बाईक रॅलीमध्ये अबालवृद्धांसह समस्त हिंदू समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. हातात भगवे ध्वज, कपाळावर टिळा आणि मुखात ‘जय श्रीराम’चा जयघोष करत हजारो रामभक्तांनी रॅलीत सहभाग नोंदवला. संपूर्ण सिरोंचा शहर राममय वातावरणाने दुमदुमून गेले होते.रॅलीच्या संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी फुलांची उधळण करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि भक्तिमय घोषणांच्या निनादात हा सोहळा अत्यंत दिमाखात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.या उपक्रमामुळे शहरातील वातावरण भक्तीमय व उत्साहपूर्ण झाले असून, प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा आनंद जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य श्री राम सेनेने केल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. या रॅलीमुळे सामाजिक एकोपा आणि धार्मिक भावना अधिक दृढ झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.







