सिरोंचा :- गेल्या चार दिवसांपूर्वी कलेश्वर येथील एका अज्ञात वृद्ध व्यक्ती घरातून निघून रस्त्याने भटकत गेल्याची घटना समोर आली होती. सदर वृद्ध व्यक्तीची ओळख सुरुवातीला पटली नव्हती. मात्र पुढील शोध कार्यादरम्यान त्या व्यक्तीचे नाव रेवेल्ली सरय्या असल्याचे निष्पन्न झाले.दरम्यान, सिरोंचा तालुक्यात सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय असलेल्या मूलकला फाऊंडेशनचे प्रमुख सागर मूलकला व त्यांच्या सहकाऱ्यांना वाडदम परिसरात रस्त्यावर एक वृद्ध व्यक्ती पडलेल्या अवस्थेत दिसल्याची माहिती गावकऱ्यांकडून मिळाली. तत्काळ घटनास्थळी पोहोचून त्यांनी त्या वृद्धाची विचारपूस केली व ओळख पटविण्याचा प्रयत्न केला.चौकशीअंती संबंधित वृद्ध व्यक्ती कलेश्वर येथील रहिवासी असल्याचे समजले. त्यानंतर सामाजिक बांधिलकी जपत सागर मूलकला व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ त्या व्यक्तीच्या नातेवाईकांशी संपर्क साधून माहिती दिली.माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी येऊन भटकून गेलेल्या वृद्ध व्यक्तीला सुखरूप ताब्यात घेत घरी नेले. आपल्या कुटुंबीयांची सुरक्षित भेट घडवून आणल्याबद्दल नातेवाईकांनी मूलकला फाऊंडेशनचे प्रमुख सागर मूलकला यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.या घटनेमुळे सामाजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे एका कुटुंबाला मोठा दिलासा मिळाल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.






