सिरोंचा (प्रतिनिधी):तालुक्यातील पेंटीपाका गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या इयत्ता पहिलीतील उमेश राजेश काळबांडे (वय ८) या अल्पवयीन विद्यार्थ्याला ३ जानेवारी रोजी शाळेच्या वेळेत शिक्षक मधुकर बट्टीवार यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत उमेश या मुलगा जखमी झाला होता.या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे सिरोंचा तालुका अध्यक्ष तसेच पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर मूलकला यांनी तत्काळ जखमी मुलाच्या घरी भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे,जखमी मुलाचे कुटुंब अत्यंत गरीब असून उपचारासाठी त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आले. ही बाब लक्षात घेऊन सागर मूलकला यांनी स्वतः पुढाकार घेत जखमी मुलाच्या उपचारासाठी आर्थिक मदत केली.यावेळी त्यांनी संबंधित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे ठाम आश्वासन दिले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे कार्यकर्ते उपस्थित होते.या घटनेमुळे शालेय स्तरावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून संबंधित शिक्षकावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.







