सागर मूलकला/ सिरोंचा
सिरोंचा : तालुक्यातील पेंटीपाका ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या लांबडपल्ली येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील सम्मक्का–सारक्का देवींची यात्रा शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडली.पुजारी अकुदारी समय्या यांच्या नेतृत्वाखाली मेडाराम येथील प्रसिद्ध सम्मक्का–सारक्का यात्रेच्या एक आठवडा आधी लांबडपल्ली येथे दरवर्षी दोन दिवसीय यात्रा आयोजित केली जाते. यावर्षीदेखील ही परंपरा कायम ठेवत भक्तीमय वातावरणात यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.या यात्रेसाठी पेंटीपाका परिसरातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली. देवींच्या दर्शनासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लावून श्रद्धेने पूजा-अर्चा केली. संपूर्ण परिसर ‘जय सम्मक्का–सारक्का’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.यात्रेदरम्यान धार्मिक विधी, पूजा-अर्चा आणि पारंपरिक विधी मोठ्या श्रद्धेने पार पाडण्यात आले. या यात्रेला ग्रामपंचायत पेंटीपाकाचे उपसरपंच शंकर नरहरी यांच्यासह अनेक मान्यवर, ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.शांततेत, सुव्यवस्थित आणि भक्तिभावाने यात्रा पार पडल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून यात्रेचे सर्वत्र कौतुक होत आहे.







