सिरोंचा :सिरोंचा नगर पंचायत हद्दीतील सर्व १७ वॉर्डमध्ये तसेच शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ व वर्दळीच्या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुलतान यांनी केली आहे.सिरोंचा हे शहर तेलंगणा व छत्तीसगड या दोन राज्यांना जोडणारे महत्त्वाचे सीमावर्ती शहर असून, दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिकांची ये-जा सुरू असते. व्यापार, वाहतूक तसेच विविध कामानिमित्त बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या सातत्याने वाढत असल्याने शहरातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.अशा परिस्थितीत शहरातील प्रमुख रस्ते, चौक, शासकीय कार्यालय परिसर, बाजारपेठा तसेच वर्दळीच्या ठिकाणी सीसी कॅमेरे असणे अत्यंत आवश्यक असल्याचे रवी सुलतान यांनी म्हटले केले. सीसी कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारी घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीही ते उपयुक्त ठरणार आहेत.नगर पंचायत प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्त्वाची असून, शहरात लवकरात लवकर सीसी कॅमेरा यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी नागरिकांकडूनही होत आहे.







