सिरोंचा | प्रतिनिधी, सागर मूलकला
सिरोंचा तालुक्यातील बोरामपल्ली नाल्यावरील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून व श्रमदानातून उभारलेला रपटा यावर्षीच्या पहिल्याच पावसात वाहून गेल्याची घटना घडली आहे. नाल्याला आलेल्या पुराच्या तीव्र प्रवाहामुळे रपटा तुटून वाहून गेल्याने परिसरातील नागरिकांसमोर मोठी वाहतूक समस्या निर्माण झाली आहे.
रपटा वाहून गेल्यामुळे बोरामपल्लीसह परिसरातील गावांचा संपर्क तात्पुरता खंडित झाला असून शालेय विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी तसेच दैनंदिन कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
ग्रामस्थांनी स्वतःच्या आर्थिक योगदानातून आणि श्रमदानातून उभारलेले हे बांधकाम पहिल्याच पावसात वाहून गेल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून या ठिकाणी मजबूत व कायमस्वरूपी रपटा किंवा पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
यासोबतच पावसाळ्याच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्यायी वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून गावांचा संपर्क अबाधित राहील, अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन बोरामपल्ली नाल्यावर कायमस्वरूपी मजबूत पूल उभारण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी सिरोंचा तालुका भाकपाचे कार्यकर्ते रवि बारसागंडी यांनी केली आहे.







