सिरोंचा | प्रतिनिधी : सागर मूलकला
सिरोंचा शहरातील स्वामी विवेकानंद चौक ते नेहरू चौक या महत्त्वाच्या मार्गावरील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांची गैरसोय होत होती. अपघाताचा धोका वाढल्याने नागरिकांकडून तातडीने दुरुस्तीची मागणी करण्यात येत होती.या समस्येची गंभीर दखल घेत नगरसेवक रंजीत गागापुरवार व इम्तियाज खान यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन सादर करून संबंधित रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी करून त्वरित कार्यवाही सुरू केली आहे.सध्या रस्त्यावरील खड्डे बुजविणे व डागडुजीची कामे युद्धपातळीवर सुरू असून, पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ही कार्यवाही तात्पुरती असली तरी नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरत आहे.यावेळी नगरसेवक रंजीत गागापुरवार यांनी सांगितले की, “जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत असून नागरिकांच्या हिताच्या प्रत्येक प्रश्नावर प्रशासनाकडे ठामपणे आवाज उठवत राहू. शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी आमचे प्रयत्न कायम सुरू राहतील.”दरम्यान, संबंधित रस्त्याचे दर्जेदार व कायमस्वरूपी बांधकाम लवकरात लवकर करण्यात यावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. तात्पुरत्या डागडुजीबरोबरच रस्त्याचे सिमेंट काँक्रीट अथवा डांबरीकरण करून दीर्घकालीन उपाययोजना करावी, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.







