सिरोंचा | प्रतिनिधी : सागर मूलकला
पर्यावरण संवर्धनाचा संदेश कृतीतून देत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, नडिकुडा येथे बुधवारी (दि. ८ जुलै) भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शाळेचे मुख्याध्यापक एस. एल. सद्दी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध वृक्षांची लागवड केली.कार्यक्रमाला सरकार साहेब (वन क्षेत्र सहाय्यक अधिकारी, वडदन) तसेच निलम साहेब (वन क्षेत्र सहाय्यक अधिकारी, चिट्टूर) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. यावेळी डॉ. एस. ए. झोडे, कांबळे सर, शिंदे सर आणि कु. जयशिला दुर्गे (वनपाल) यांची प्रमुख उपस्थिती होती.शाळा परिसरात विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व, पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे जतन आणि निसर्ग संवर्धनाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. “एक माणूस – एक झाड” हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात आला.कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने एक वृक्ष दत्तक घेत त्याची नियमित निगा राखण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबतची जाणीव आणि जबाबदारीची भावना अधिक दृढ झाली.कार्यक्रमाच्या शेवटी शिंदे सर यांनी उपस्थित मान्यवर, वन विभागाचे अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. तसेच वन विभागातर्फे सहभागी विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात आल्याने मुलांचा आनंद द्विगुणित झाला.नडिकुडा शाळेने राबविलेला हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाची जनजागृती करण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाची सवय रुजविणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला असून परिसरात त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.







