सिरोंचा, प्रतिनिधी : शहरातील स्वामी विवेकानंद चौक ते नेहरू चौक या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नगरसेवक रंजित नागेश्वर गागापूरवार व इम्तियाज खान यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर करून प्रशासनाचे लक्ष वेधले. तसेच प्रलंबित रस्त्याचे बांधकाम तात्काळ सुरू करण्यासह रस्त्यावरील खड्डे बुजवून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी केली.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सदर रस्त्याच्या अंदाजे १ कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन विधानसभा निवडणुकीपूर्वी करण्यात आले होते. मात्र जवळपास दोन वर्षांचा कालावधी लोटूनही प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित विभागाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.स्वामी विवेकानंद चौक ते नेहरू चौक हा सिरोंचा शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग असून या रस्त्याचा वापर दररोज शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी तसेच विविध धार्मिक स्थळांना जाणारे भाविक करतात. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात चिखल व पाण्याचे डबके साचत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी अपघातांचा धोका देखील वाढला आहे.नगरसेवक रंजित गागापूरवार व इम्तियाज खान यांनी निवेदनाद्वारे रस्त्याच्या कामाची सद्यस्थिती, मंजूर व वितरित निधीची माहिती तसेच काम सुरू न होण्यामागील कारणांचा लेखी खुलासा करण्याची मागणी केली आहे. यासोबतच मुख्य बांधकाम सुरू होईपर्यंत रस्त्यावरील सर्व खड्डे तातडीने बुजवून आवश्यक ठिकाणी मुरूम, खडी व जीएसबी टाकून रस्ता वाहतुकीयोग्य करण्याची मागणी करण्यात आली आहे.मागण्यांवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास नागरिकांच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.यावेळी नगरसेवक रंजित नागेश्वर गागापूरवार, इम्तियाज खान तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.







