सिरोंचा | प्रतिनिधी, सागर मूलकला
सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या अवघ्या पाच वर्षीय चिमुकल्याचा इंजेक्शन दिल्यानंतर संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या घटनेमुळे संपूर्ण सिरोंचा तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. मृत्यूला वैद्यकीय हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप मृत बालकाच्या पालकांनी केला असून, या प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्याची जोरदार मागणी होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रा. रसायपल्ली येथील सचिन मोहन चेवुरी (वय ५ वर्षे) याला ४ जुलै २०२६ रोजी सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शासनाच्या विशेष आरोग्य शिबिरातून पुढील उपचारासाठी त्याला रुग्णालयात आणण्यात आले होते. दिवसभर तो इतर मुलांसोबत खेळत होता व त्याची प्रकृती स्थिर असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.मात्र, रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास कर्तव्यावरील परिचारिकेने इंजेक्शन दिल्यानंतर काही क्षणांतच मुलाची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि काही वेळातच तो बेशुद्ध पडल्याचे नातेवाईकांनी सांगितले. उपस्थित डॉक्टरांनी तपासणी करून मुलाला मृत घोषित केले.घटनेनंतर संतप्त झालेल्या पालकांनी रुग्णालय परिसरात आक्रोश व्यक्त करत उपचारातील निष्काळजीपणामुळेच आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. “आमचा मुलगा दिवसभर व्यवस्थित होता. इंजेक्शन दिल्यानंतरच त्याची प्रकृती बिघडली. योग्य उपचार झाले असते तर आज आमचा मुलगा जिवंत असता,” असा भावनिक आरोप पालकांनी केला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी गडचिरोली येथे पाठविण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संबंधित डॉक्टर, परिचारिका व जबाबदार कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांसह विविध सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.दरम्यान, या घटनेची माहिती घेण्यासाठी गेलेल्या काही पत्रकारांनाही समाधानकारक माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप होत असून, प्रशासनाच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
टीप :या प्रकरणात वैद्यकीय हलगर्जीपणाचे आरोप हे मृत बालकाच्या पालकांनी केलेले आरोप आहेत. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल व अधिकृत चौकशी पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल.







