सिरोंचा | प्रतिनिधी – सागर मूलकलासिरोंचा नगरपंचायतीतील अविश्वासाच्या राजकारणाने काही महिन्यांपूर्वी संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले होते. नगराध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या कारभाराविरोधात तब्बल १४ नगरसेवकांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. या घडामोडीनंतर नगरपंचायतीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.मिळालेल्या माहितीनुसार, विकासकामांतील विलंब, निर्णय प्रक्रियेबाबतची नाराजी तसेच प्रशासनातील विविध मुद्द्यांवरून नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. शासनाच्या नियमानुसार झालेल्या विशेष सभेत तत्कालीन नगराध्यक्षांविरोधात १४ नगरसेवकांनी मतदान केल्याने त्यांना पद गमवावे लागले. त्यानंतर सौ. पद्मा सतीश बोगे यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.मात्र, अध्यक्षपदावरील बदलानंतरही उपाध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्तावाबाबत अद्याप कोणतीही अंतिम कार्यवाही झालेली नसल्याने नगरातील राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. अध्यक्षांसोबतच उपाध्यक्षांविरोधातही प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्यामुळे त्याबाबतची पुढील प्रक्रिया कधी राबविली जाणार, याकडे नगरवासीयांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, स्थानिक राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क व्यक्त होत असले तरी त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे अधिकृत निर्णय होईपर्यंत या चर्चांकडे केवळ राजकीय चर्चेच्या स्वरूपातच पाहिले जात आहे.याबाबत नगराध्यक्ष सौ. पद्मा सतीश बोगे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “येत्या आठवड्यात सर्व १४ नगरसेवकांची बैठक घेण्यात येणार असून, त्या बैठकीत उपाध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्तावाबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल.”या विधानामुळे उपाध्यक्षांविरोधातील प्रस्तावाबाबतची प्रक्रिया पुन्हा वेग घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता नगरवासीयांचे लक्ष येत्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीकडे लागले असून, त्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.







