सिरोंचा | प्रतिनिधी, सागर मूलकला
सिरोंचा तालुक्यातील जि.प. उच्च प्राथमिक शाळा, नडिकुडा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे येथे वंचित व दलित मुलांसाठी सुरू केलेल्या पहिल्या शाळेच्या स्थापना दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी व अभ्यासक्रमावरील प्रभुत्व वाढावे या उद्देशाने ‘प्रश्नमंजुषा व सामान्य ज्ञान’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस. एल. सद्दी सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एस. ए. झोडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इसाक आकुदारी, विकास आत्राम (NPW), प्रकाश जल्लारपू तसेच आशा वर्कर वेंकटम्मा आकुदारी उपस्थित होते.स्पर्धेत इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. विद्यार्थ्यांचे प्रत्येकी पाच सदस्यांचे तीन गट तयार करण्यात आले होते. इतिहास, विज्ञान, गणित, मराठी आणि सामान्य ज्ञान या विषयांवरील अभ्यासक्रमाधारित प्रश्न विचारण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अचूक उत्तरे दिल्याने स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली.स्पर्धेतील विजेत्या गटाला मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच इतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारगोनी सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिंदे सर यांनी मानले.यावेळी अध्यक्ष एस. एल. सद्दी यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून वर्गात मिळालेले ज्ञान अधिक दृढ होत असल्याचे सांगितले. डॉ. एस. ए. झोडे यांनी विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासासोबत स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







