सिरोंचा | प्रतिनिधी :सिरोंचा तालुक्यातील ग्रामदैवतांची पारंपरिक पद्धतीने पूजा करणाऱ्या पांबाला समाजातील पुजाऱ्यांना आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे आयोजित करण्यात आलेल्या माता येल्लम्मा देवींच्या पवित्र कोलुपु पूजेसाठी विशेष निमंत्रण प्राप्त झाले आहे.या धार्मिक सोहळ्यासाठी सिरोंचा तालुक्यातील ग्रामदैवतांची सेवा करणारे पांबाला पुजारी आकाश मूलकला, सागर मूलकला, चिन्ना मूलकला, स्वामीराज मूलकला, समित संगेम आणि उदय मूलकला हे तिरुपतीकडे रवाना झाले आहेत.माता येल्लम्मा देवींच्या कोलुपु पूजेला धार्मिक व सांस्कृतिक परंपरेत विशेष महत्त्व असून, या पूजेसाठी सिरोंचा तालुक्यातील पांबाला पुजाऱ्यांना मिळालेले निमंत्रण ही तालुक्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. या माध्यमातून सिरोंचा तालुक्याची धार्मिक परंपरा आणि पांबाला समाजाची सेवा व्यापक स्तरावर पोहोचत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.या धार्मिक यात्रेसाठी रवाना झालेल्या सर्व पुजाऱ्यांना भाविक व नागरिकांकडून शुभेच्छा देण्यात येत असून, माता येल्लम्मा देवीच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदो, अशी प्रार्थना करण्यात येत आहे.






