सागर मूलकला,सिरोंचा
सिरोंचा | प्रतिनिधीभारत निवडणूक आयोग व महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार राज्यभर मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision) कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रात दि. 20 जून ते 7 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विविध टप्प्यांत कामकाज करण्यात येणार आहे.या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात दि. 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) मतदारांच्या घरोघरी जाऊन गणना प्रपत्र (Enumeration Form – EF) वितरित करीत असून संबंधित प्रपत्र भरून घेत आहेत.सिरोंचा येथील मतदान केंद्र क्रमांक 258 – सिरोंचा माल येथे मा. सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार, सिरोंचा श्री. अजय सकुंदरवार, नायब तहसीलदार (निवडणूक) श्री. राजेश्वर मसराम, महसूल सहाय्यक (निवडणूक) श्री. धनराज जगताप, डेटा ऑपरेटर (निवडणूक) श्री. अजमतखान पठाण तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) श्री. श्रीनिवास मारगोनी यांच्या उपस्थितीत मतदारांच्या घरी जाऊन गणना प्रपत्रांचे वितरण करण्यात आले.यावेळी तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी सिरोंचा तालुक्यातील सर्व मतदारांना आवाहन केले आहे की, आपल्या मतदार यादीतील भाग क्रमांकानुसार नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याशी संपर्क साधून स्वतःचे तसेच आपल्या कुटुंबातील सर्व पात्र मतदारांचे गणना प्रपत्र (EF) वेळेत भरून द्यावेत. तसेच मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमास नागरिकांनी सक्रिय सहकार्य करून मतदार यादी अद्ययावत करण्यास हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.







