सागर मूलकला / सिरोंचा
सिरोंचा | प्रतिनिधी : सिरोंचा नगरपंचायतीचे नवनियुक्त मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार राजू सिडाम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नगरसेवक रंजित नागेश्वर गागापूरवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शहरातील विविध नागरी समस्यांबाबत सविस्तर निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.निवेदनात आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व नाल्यांची त्वरित स्वच्छता करणे, बंद असलेले पथदिवे व हायमास्ट दिवे सुरू करणे, डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमित फोगिंग करणे, ब्लिचिंग पावडरची फवारणी करणे तसेच मान्सूनपूर्व आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी करण्यात आली.याशिवाय, सध्या आंदोलनाच्या मार्गावर असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित व न्याय्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन शहरातील स्वच्छता व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंतीही करण्यात आली.यावर मुख्याधिकारी राजू सिडाम यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच नागरिकांच्या मूलभूत समस्यांच्या निराकरणासाठी प्रशासनामार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.यावेळी नगरसेवक रंजित नागेश्वर गागापूरवार, नगरसेवक इम्तियाज खान तसेच युवक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.







