सिरोंचा | प्रतिनिधी, सागर मूलकला
सिरोंचा तालुक्यातील जि. प. उ. प्राथमिक शाळा, नडिकुडा येथे सोमवार (दि. ६ जुलै २०२६) रोजी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन शाळेची पाहणी केली. यावेळी शाळेतील स्वच्छता, व्यवस्थापन व शैक्षणिक वातावरणाचे अधिकाऱ्यांनी कौतुक केले.या भेटीदरम्यान डॉ. गोहे यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी शाळेतील वर्गखोल्या, किचन शेड तसेच संपूर्ण परिसराची सखोल पाहणी केली. शाळेतील स्वच्छता आणि नीटनेटके व्यवस्थापन पाहून अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करत शाळेच्या कार्याचे विशेष कौतुक केले.विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने यावेळी शाळेला “आरोग्य किट” प्रदान करण्यात आले. हे किट शाळेचे मुख्याध्यापक एस. एल. सद्दी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या किटमध्ये प्राथमिक उपचारासाठी आवश्यक साहित्य तसेच विविध आरोग्यविषयक साहित्याचा समावेश आहे.यावेळी डॉ. गोहे यांनी विद्यार्थ्यांना मलेरिया, डेंग्यू तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या इतर संसर्गजन्य आजारांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पाणी उकळून पिणे, डासांपासून संरक्षण करणे, नियमित हात स्वच्छ धुणे आणि आजाराची लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय उपचार घेण्याचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक एस. एल. सद्दी, मारगोनी सर, शिंदे सर तसेच डॉ. एस. ए. झोडे उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती निर्माण झाली असून शाळा प्रशासनाने आरोग्य विभागाचे आभार मानले.







