सिरोंचा | प्रतिनिधी, सागर मूलकला
सिरोंचा तालुक्यातील पेन्टीपाका येथील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या वॉटर पाईपलाईनच्या कामानंतर रस्ते पूर्ववत न केल्यामुळे संपूर्ण परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, ग्रामपंचायत व संबंधित कंत्राटदाराच्या निष्काळजीपणाबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
माहितीनुसार, पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याच्या मधोमध तसेच कडेला मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर खड्डे व्यवस्थित बुजवण्यात आले नाहीत किंवा रस्ता पूर्ववत करण्यात आला नाही. दरम्यान, सतत पडणाऱ्या पावसामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय झाला असून जागोजागी पाणी साचले आहे.
या परिस्थितीमुळे दुचाकी तसेच इतर वाहने वारंवार चिखलात फसत असून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. लहान मुले, वृद्ध नागरिक आणि आजारी व्यक्तींना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. दैनंदिन ये-जा करताना नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी ही समस्या कंत्राटदाराच्या निदर्शनास आणून दिली असता, त्याने नागरिकांशी उद्धटपणे वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायतीकडून या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही वॉर्डातील नागरिकांनी केला आहे.
नागरिकांनी संबंधित प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्त करून वाहतुकीस योग्य बनवावा, तसेच निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारावर योग्य कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.







