सिरोंचा | प्रतिनिधी : सागर मूलकला
सिरोंचा नगरपंचायत हद्दीतील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी-जास्त दाबाची समस्या तसेच विविध भागांतील प्रलंबित विद्युत दुरुस्ती व देखभाल कामांच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पद्मा सत्यनारायण बोगे यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीच्या शिष्टमंडळाने महावितरण कार्यालयाला भेट देऊन अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.यावेळी नागरिकांच्या वतीने वीज समस्यांचा प्रश्न प्रभावीपणे मांडण्यात आला. शहरातील नागरिकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा मिळावा, वारंवार होणारे वीज खंडित होणे थांबवावे, तसेच कमी-जास्त दाबाची समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी करण्यात आली.महावितरणचे अभियंता दिनेश सिडाम यांनी शिष्टमंडळाला आवश्यक त्या उपाययोजना करून वीजपुरवठा अधिक सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.या भेटीत नगराध्यक्ष पद्मा बोगे, सभापती पद्मा पिल्लीवार, नगरसेवक रंजीत गागापुरवार तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू असून वीज समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असे शिष्टमंडळाने सांगितले.







