सिरोंचा : प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत लाभार्थ्यांच्या सर्वेक्षण व Geo-Tagging प्रक्रियेदरम्यान अनधिकृत पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी तसेच अनेक लाभार्थ्यांना पहिला हप्ता अद्याप प्रत्यक्ष मिळाला नसल्याच्या तक्रारींची तातडीने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक रंजित नागेश्वर गागापुरवार यांनी केली आहे.यासंदर्भात आज नगरपंचायत अध्यक्षा व मुख्याधिकारी यांना नगरसेवक गागापुरवार यांनी सविस्तर निवेदन सादर केले. सर्वेक्षण, घराची पाहणी किंवा Geo-Tagging फोटो काढण्यासाठी कोणतेही अधिकृत शुल्क आहे किंवा नाही, याबाबत प्रशासनाने स्पष्ट खुलासा करावा, तसेच पैशांची मागणी झाल्याच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून लाभार्थ्यांचे जबाब नोंदवावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.दरम्यान, काही लाभार्थ्यांच्या मोबाईलवर हप्ता “Credited” झाल्याचा संदेश प्राप्त झाला असतानाही त्यांच्या बँक खात्यात प्रत्यक्ष रक्कम जमा झालेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे PMAY-MIS मधील नोंदी आणि प्रत्यक्ष बँक व्यवहार यांची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.“हप्ता मंजूर झाला आहे का, मंजुरीची तारीख व रक्कम किती, DBT कधी करण्यात आला, Transaction ID/UTR क्रमांक काय आहे, Payment Status काय आहे आणि रक्कम Failed किंवा Rejected असल्यास त्याचे कारण काय आहे,” यासह लाभार्थीनिहाय संपूर्ण माहिती प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी गागापुरवार यांनी केली.तसेच पहिला हप्ता न मिळालेल्या सर्व लाभार्थ्यांची यादी तयार करून प्रत्येक प्रकरणातील अडचणी दूर कराव्यात आणि पात्र लाभार्थ्यांना त्यांचा शासकीय लाभ तातडीने मिळण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करावा, अशीही मागणी करण्यात आली.या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून अनधिकृत पैशांची मागणी झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांवर नियमानुसार प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी आणि चौकशीचा लेखी अहवाल नगरसेवक म्हणून उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.“गरीब व गरजू नागरिकांच्या हक्काच्या घरकुल योजनेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा आर्थिक अडवणूक सहन केली जाणार नाही. पात्र लाभार्थ्यांना त्यांचा हक्काचा शासकीय लाभ पारदर्शकपणे मिळाला पाहिजे,” अशी भूमिका नगरसेवक रंजित गागापुरवार यांनी व्यक्त केली.







