ईद-ए-मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य; नगराध्यक्षांच्या कार्यतत्परतेचे कौतुक
सागर मुलकला / सिरोंचा
सिरोंचा : ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने २६ ऑगस्ट रोजी सिरोंचा शहरात आयोजित जुलूस व बाइक रॅलीच्या मार्गावरील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याबाबत करण्यात आलेल्या निवेदनाची सिरोंचा नगरपंचायत अध्यक्षा पद्माताई सतीश बोगे यांनी तत्काळ दखल घेत प्रत्यक्ष कार्यवाही करून दाखविली आहे.जुलूस व बाइक रॅलीच्या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिक तसेच बाइकस्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. विशेषतः मोठ्या संख्येने युवक सहभागी होणाऱ्या बाइक रॅलीदरम्यान खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता लक्षात घेता, संबंधित मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली होती.निवेदन मिळाले आणि काम सुरू झाले, अशा पद्धतीने नगरपंचायत प्रशासनाने नागरिकांच्या मागणीला प्रतिसाद दिला. नगराध्यक्ष पद्माताई सतीश बोगे यांनी केवळ आश्वासन न देता संबंधित यंत्रणेला सूचना देऊन जुलूस मार्गावरील खड्डे बुजविण्याची कार्यवाही करून घेतली.नगराध्यक्षांनी महिला पदावर असूनही नागरिकांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहत, निवेदनाची दखल घेऊन तातडीने समस्या सोडविण्याचे कर्तव्य बजावल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. सार्वजनिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची सुरक्षितता हा केवळ विकासाचा मुद्दा नसून नागरिकांच्या जीविताशी निगडित प्रश्न आहे. ही बाब लक्षात घेऊन पद्माताई बोगे यांनी दाखविलेली तत्परता कौतुकास्पद ठरत आहे.ईद-ए-मिलादुन्नबीच्या जुलूसमध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने नागरिक व युवक सहभागी होतात. त्यामुळे जुलूस मार्ग सुरक्षित व सुस्थितीत असणे आवश्यक होते. वेळेचे गांभीर्य ओळखून नगरपंचायत प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे जुलूसमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.यापूर्वी खड्ड्यांच्या समस्येबाबत नगराध्यक्षांकडे निवेदन देताना नगरसेविका नुसरत बाबर शेख, नगरसेवक इंतियाज खान, भाजप जिल्हा महामंत्री शारिक शेख, समाजसेवक सिद्दीक भाई, साजिद सैयद (सज्जू भाई), जाविद खान व इझहार शेख उपस्थित होते.आश्वासन नव्हे, कृतीतून दाखविले नेतृत्व!नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नाला सकारात्मक प्रतिसाद देत पद्माताई सतीश बोगे यांनी “निवेदनाची दखल घेणे आणि नागरिकांच्या समस्येचे निराकरण करणे” हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यतत्परतेचे आणि संवेदनशील नेतृत्वाचे नागरिकांकडून अभिनंदन केले जात आहे.महिला नगराध्यक्ष म्हणून पद्माताई बोगे यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत दाखविलेली ही कार्यक्षमता निश्चितच आदर्शवत असून, त्यांच्या तत्पर निर्णयाचे शहरवासीयांकडून स्वागत होत आहे.







