प्रतिनिधी, सागर मूलकला सिरोंचा
सिरोंचा : सिरोंचा तालुक्यात रासायनिक खतांची विक्री शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने होत असल्याच्या तक्रारींची कृषी विभागाने गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व रासायनिक खत विक्रेत्यांना कृषी विभागाकडून नोटीस बजावून अतिरिक्त दराने खतांची विक्री न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सिरोंचा यांच्या दिनांक २० ऑगस्ट २०२६ रोजीच्या पत्रानुसार, शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांची विक्री शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दराने होत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यासंदर्भात कृषी विभागाकडून प्राप्त सूचनांच्या आधारे सर्व खत विक्रेत्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत.कृषी केंद्र चालकांनी शासनाने निर्धारित केलेल्या दरानेच खतांची विक्री करावी. तसेच खत किंवा इतर कृषी निविष्ठा खरेदी करताना शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे घेतल्याचे आढळून आल्यास संबंधित विक्रेत्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.दरम्यान, सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कोणत्याही कृषी केंद्राकडून खत, कीटकनाशके किंवा इतर कृषी निविष्ठांसाठी अतिरिक्त पैसे घेतले जात असल्यास संबंधित कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारदार शेतकऱ्याचे नाव व गावाची माहिती गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.त्यामुळे खत खरेदी करताना शेतकऱ्यांनी शासनाने निर्धारित केलेला दर तपासूनच खरेदी करावी आणि अतिरिक्त पैसे आकारल्यास तत्काळ कृषी विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.







