प्रतिनिधी – सागर मुलकला, सिरोंचा
सिरोंचा : ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने सिरोंचा शहरात २६ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या जुलूस व बाइक रॅलीच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत क्षेत्रातील जुलूस मार्गावरील रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी नगरपंचायत अध्यक्षा श्रीमती पद्मा सतीश बोगे यांच्याकडे करण्यात आली.जुलूस व बाइक रॅलीच्या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, त्यामुळे जुलूसमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांसह बाइकस्वारांना अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः बाइक रॅलीदरम्यान खड्ड्यांमुळे दुर्घटना घडू नये, यासाठी जुलूसपूर्वी संबंधित मार्गाची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी तातडीने खड्डे बुजविणे व रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे निवेदनातून सांगण्यात आले.ईद-ए-मिलादुन्नबीच्या जुलूसमध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने नागरिक व युवक सहभागी होत असतात. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे उपस्थितांनी नगरपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.यावेळी नगरसेविका नुसरत बाबर शेख, नगरसेवक इंतियाज खान, भाजप जिल्हा महामंत्री शारिक शेख, समाजसेवक सिद्दीक भाई, साजिद सैयद (सज्जू भाई), जाविद खान व इझहार शेख उपस्थित होते.दरम्यान, जुलूस व बाइक रॅली सुरू होण्यापूर्वी संबंधित मार्गाची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी खड्डे बुजविण्याची कार्यवाही करण्यात येईल, अशी हमी नगरपंचायत अध्यक्षा पद्मा सतीश बोगे यांनी उपस्थितांना दिली.







