सागर मुलकला, सिरोंचा, प्रतिनिधी
सिरोंचा : तालुक्यातील सोमनूर जुन्या गावात अंगणवाडीला लागून असलेले सुमारे ४०० वर्षे जुने भलेमोठे चिंचेचे झाड सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अचानक कोसळल्याची घटना घडली. या घटनेत मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.गावच्या मध्यभागी असलेले हे चिंचेचे झाड चार पिढ्यांपासून ग्रामस्थांसाठी सावली व आधार देणारे ठरले होते. या झाडाखाली ग्रामपंचायतीच्या बैठका तसेच गावातील विविध विषयांवर चर्चा होत असल्याने झाडाला गावाच्या सामाजिक जीवनात विशेष महत्त्व होते.झाड कोसळल्याने अंगणवाडीसमोरील बोअरिंग व हँडपंपचे नुकसान झाले आहे. तसेच असरअल्लीकडून सोमनूरकडे येणाऱ्या मुख्य वीजवाहिनीच्या तारा झाडावर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला असून काही तारा जमिनीवर आल्या आहेत.घटनेच्या वेळी सायंकाळची वेळ असल्याने अंगणवाडीतील मुले घरी गेलेली होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. झाडाच्या पूर्वेकडे अंगणवाडी, तर पश्चिमेकडे पुलसे रमेश यांचे घर आहे. झाड घरावर कोसळले असते तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती.या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी या जुन्या झाडाला गावाच्या इतिहासाचा साक्षीदार मानत, ‘हे झाड आमच्या गावचा देवच होते. त्याच्या कृपेनेच मोठा अनर्थ टळला,’ अशी भावना व्यक्त केली.दरम्यान, महावितरणने तातडीने जमिनीवर आलेल्या वीजतारा हटवून वीजपुरवठा सुरळीत करावा, तसेच ग्रामपंचायत गुम्मलकोंडाने पडलेले झाड हटवून नुकसान झालेला हँडपंप व बोअरिंग दुरुस्त करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.







