दोन वॉचमन तैनात, गोडाऊनची चावी अधिकाऱ्यांकडे; तरीही चोरी कशी झाली ?
प्रतिनिधी – सागर मूलकला सिरोंचा
सिरोंचा : सिरोंचा येथील विद्युत महावितरणच्या गोडाऊनमधून पोलवरून काढण्यात आलेला तब्बल 8 ते 9 टन कंडक्टर चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे गोडाऊनच्या सुरक्षेसाठी दोन वॉचमन तैनात असताना आणि गोडाऊनची चावी महावितरणचे कनिष्ठ अभियंता कंकाल यांच्याकडे असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात साहित्य चोरीला गेल्याने महावितरणच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.महावितरणच्या गोडाऊनमधून कोणतेही वीज साहित्य, कंडक्टर अथवा ट्रान्सफॉर्मर बाहेर काढताना वॉचमनकडे त्याची नोंद करणे बंधनकारक असल्याचे सांगितले जाते. मात्र, चोरीला गेलेल्या कंडक्टरबाबत गोडाऊनच्या नोंदवहीत कोणतीही एन्ट्री आढळून आलेली नाही, अशी माहिती कनिष्ठ अभियंता कंकाल यांनी माध्यमांशी बोलताना दिली.दरम्यान, कनिष्ठ अभियंता कंकाल हे सुट्टीवर असताना गोडाऊनची चावी अशोक येलपुला यांच्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत गोडाऊनची चावी कोणाच्या ताब्यात होती, गोडाऊनमध्ये कोणाची ये-जा झाली, चोरीला गेलेले साहित्य नेमके कधी बाहेर काढण्यात आले आणि एवढ्या मोठ्या प्रमाणातील कंडक्टर बाहेर नेताना वॉचमनच्या निदर्शनास हे कसे आले नाही, असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.8 ते 9 टन कंडक्टर चोरीला जाणे ही साधी बाब नसून महावितरणच्या सुरक्षाव्यवस्थेतील मोठ्या त्रुटींचे संकेत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सखोल व निष्पक्ष चौकशी करून गोडाऊनमधील नोंदी, चावीचा ताबा, सुरक्षा रजिस्टर तसेच उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे. दोषी आढळणाऱ्या अधिकारी, कर्मचारी किंवा संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करून चोरीला गेलेले साहित्य किंवा त्याची किंमत वसूल करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.या प्रकरणाच्या चौकशीतून महावितरणच्या गोडाऊनच्या सुरक्षा व्यवस्थेतील नेमकी उणीव आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कंडक्टर गायब होण्यामागील कारण स्पष्ट होणार का, याकडे सिरोंचावासीयांचे लक्ष लागले आहे.







