श्रावीण चेन्नुरी मृत्यू प्रकरणी चौकशी व ₹२५ लाख नुकसानभरपाईची मागणी
पब्लिक समाचार न्यूज सिरोंचा
सिरोंचा : मुख्यमंत्री मोफत हृदयविकार तपासणी शिबिराच्या अनुषंगाने ग्रामीण रुग्णालय, सिरोंचा येथे उपचारासाठी आणलेल्या ५ वर्षीय श्रावीण मोहन चेन्नुरी, रा. रंगयापल्ली या बालकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याप्रकरणी निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच पीडित कुटुंबास किमान २५ लाख रुपयांची विशेष सानुग्रह आर्थिक मदत/नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.याबाबत तालुका अध्यक्ष पत्रकार संघटना, सिरोंचाचे सागर मूलकला यांनी मा. जिल्हा शल्यचिकित्सक, गडचिरोली यांना निवेदन देऊन विविध मागण्या केल्या आहेत.निवेदनानुसार, श्रावीण चेन्नुरी या बालकाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर बालकाची प्रकृती अचानक बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे उपचार प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, संपूर्ण प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.बालकाला देण्यात आलेल्या इंजेक्शनचे नाव, मात्रा, बॅच नंबर, एक्सपायरी डेट, औषधाची नोंद व स्टॉक रजिस्टर, डॉक्टरांचे आदेश, केस शीट, नर्सिंग नोट्स, उपचाराची संपूर्ण नोंद तसेच मृत्यूचे वैद्यकीय कारण यांची सखोल तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच घटनेच्या वेळेचे उपलब्ध CCTV फुटेज सुरक्षित ठेवून तपासावे आणि संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.सदर प्रकरणात वैद्यकीय निष्काळजीपणा झाला आहे, असे पूर्वनिर्धारित न करता स्वतंत्र वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीमार्फत पारदर्शक चौकशी करण्यात यावी. चौकशीत वैद्यकीय निष्काळजीपणा किंवा कर्तव्यात कसूर आढळल्यास संबंधितांवर विभागीय तसेच लागू कायद्यानुसार कारवाई करावी, अशी भूमिका पत्रकार संघटनेने घेतली आहे.दरम्यान, चेन्नुरी कुटुंबाला न्याय मिळाला नाही आणि शासनाकडून योग्य आर्थिक मदत व चौकशीबाबत ठोस निर्णय घेण्यात आला नाही, तर लवकरच ग्रामीण रुग्णालय, सिरोंचा समोर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.५ वर्षीय बालकाचा मृत्यू ही अत्यंत संवेदनशील घटना असून, या प्रकरणाची सत्य परिस्थिती जनतेसमोर आणून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी सागर मूलकला यांनी केली आहे.







