प्रतिनिधी सागर मुलकला, सिरोंचा
सिरोंचा : आसरअल्ली वनपरिक्षेत्रातील सर्वे क्रमांक ४९३, ५८० व ३१६, गाढा-गोलागुडमाल परिसरातील वनजमिनींसंदर्भात अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासींच्या वनहक्क कायदा (Forest Rights Act) अंतर्गत प्रलंबित अर्ज व दाव्यांच्या पडताळणी प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होत असल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर वनपरिक्षेत्र अधिकारी एस. ए. पानगे यांनी नागरिकांना वस्तुस्थिती समजून घेण्याचे आवाहन केले आहे.वनविभागाने स्पष्ट केले आहे की, सध्या सुरू असलेली प्रक्रिया ही नवीन वनजमिनीचे वाटप करण्यासाठी नसून, १३ डिसेंबर २००५ पूर्वीपासून पात्र आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासी बांधवांच्या वनजमिनीवरील अतिक्रमणाबाबत कायद्यानुसार दाखल झालेल्या प्रलंबित वनहक्क अर्जांची छाननी व पडताळणी करण्याची प्रक्रिया आहे.या प्रक्रियेदरम्यान अध्यक्ष, उपविभागीय स्तरीय वनहक्क समिती तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार अतिक्रमणधारकांचा मौका पंचनामा, नमुना-३ व जी.पी.एस. नकाशा आदी माहिती संबंधित समिती व अधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. तसेच १३ डिसेंबर २००५ नंतर झालेल्या नवीन अतिक्रमणांना वनहक्क कायदा २००६ अंतर्गत वैध मान्यता किंवा दावा देता येत नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.वनहक्क कायद्यानुसार दाव्यांवर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार वनविभागाकडे नसून, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीकडे (DLC) असल्याचे वनविभागाने नमूद केले आहे. वनविभागाची भूमिका प्रामुख्याने तांत्रिक तपासणी व मोजणीसाठी सहकार्य करण्याची आहे.दरम्यान, वनविभागाने नागरिकांना सोशल मीडियावरील अथवा इतर अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. वनजमिनीचा पट्टा मिळवून देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अशा व्यक्तींपासून सावध राहावे. जमीन मिळविण्याच्या आशेने वनजमिनीवरील झाडे तोडणे, साफसफाई करणे किंवा ताबा मिळविण्याचा प्रयत्न करणे हा गंभीर प्रकार असून, अशा कृत्यांवर भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत कारवाई होऊ शकते, असा इशाराही वनविभागाने दिला आहे.सर्व नागरिक व ग्रामस्थांनी वनविभागाला सहकार्य करावे आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिकृत माहितीसाठी पानगे,वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.), आसरअल्ली परिक्षेत्र यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







