महिला व मुलींच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचा पोलिसांचा संदेश; पोलीस-विद्यार्थिनींमध्ये स्नेहबंध दृढ
प्रतिनिधी – सागर मूलकला सिरोंचा
सिरोंचा, दि. ३१ ऑगस्ट २०२६ : पोलीस स्टेशन सिरोंचा येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम सोमवारी सकाळी १० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमातून पोलीस प्रशासन आणि महिला व विद्यार्थीनी यांच्यातील स्नेह, विश्वास व आपुलकीचे नाते अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. समाधान पाटील, पोलीस निरीक्षक श्री. बाबासाहेब दुधाळ, पोलीस अधिकारी व अंमलदार, एस.आर.पी.एफ.चे अधिकारी व अंमलदार, तसेच पोलीस बॉईज संघटना सिरोंचाचे तालुका अध्यक्ष श्री. विशाल मादेशी, जिल्हा परिषद शाळेचे श्री. जगदाबे सर, श्री. आर. बी. चलाख सर, भगवंतराव विद्यालयातील श्रीमती के. एम. औतकर, श्रीमती एस. वाय. येनमवार यांच्यासह शिक्षक व विद्यार्थीनी उपस्थित होत्या.या कार्यक्रमात पोलीस स्टेशन सिरोंचा येथील ३ अधिकारी व ३८ महिला-पुरुष अंमलदार, एस.आर.पी.एफ.चे १ अधिकारी व १५ अंमलदार, १० होमगार्ड, जिल्हा परिषद शाळेतील १ शिक्षक, भगवंतराव विद्यालयातील १ शिक्षक व ३ शिक्षिका तसेच ५० विद्यार्थीनी सहभागी झाल्या.यावेळी शाळेतील विद्यार्थीनींनी उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील, पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुधाळ तसेच जिल्हा पोलीस व एस.आर.पी.एफ.च्या अधिकारी-अंमलदारांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. उपस्थित महिलांना व विद्यार्थीनींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेम, विश्वास, आपुलकी आणि परस्पर संरक्षणाचा पवित्र सण आहे. समाजातील महिला व मुलींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे तसेच पोलीस आणि नागरिकांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.यावेळी पोलीस अधिकारी व अंमलदारांनी महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर असून त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असा सकारात्मक संदेश दिला.कार्यक्रमानंतर विद्यार्थीनींना ओवाळणीचे गिफ्ट म्हणून पेन, रजिस्टर व मिठाईचे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.रक्षाबंधनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमामुळे पोलीस, विद्यार्थीनी, महिला व नागरिक यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ झाले. महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वास या कार्यक्रमातून निर्माण झाला.







