प्रतिनिधी ,सागर मूलकला. सिरोंचा
सिरोंचा : तालुक्यातील ग्रामपंचायत आसरेली येथे १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या आर्थिक व प्रशासकीय कारभाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. सन २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीत विविध शासकीय योजनांतर्गत प्राप्त निधीच्या वापराची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.ग्रामपंचायतीच्या विकासकामांचा खर्च, बँक खात्यांतील व्यवहार, कामांची गुणवत्ता व प्रत्यक्ष स्थिती तपासण्याबरोबरच घरकुल लाभार्थ्यांकडून कथित पाच हजार रुपयांची वसुली, कचरा संकलनासाठी खरेदी केलेल्या वाहनांचा वापर व खरेदी प्रक्रिया यांचीही चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.यासंदर्भात गटविकास अधिकारी, पंचायत समिती सिरोंचा यांच्याकडे निवेदन देऊन मागील पाच वर्षांचे विशेष लेखापरीक्षण करून दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार प्रशासकीय व फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच चौकशीचा अहवाल ग्रामस्थांना उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी आहे.







