प्रतिनिधी – सागर मुलकला
सिरोंचा : तालुक्यातील मौजा रंगधामपेठा चेक येथील शेतकऱ्यांसाठी असलेला शासकीय शेतरस्ता अनेक वर्षांपासून अतिक्रमित असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महसूल अभिलेख, गाव नकाशा व सन १९९९ च्या प्रक्षेपणाचा गाव नकाशा यानुसार प्रत्यक्ष मोजणी करून शासकीय शेतरस्ता अतिक्रमणमुक्त करून देण्यात यावा, अशी मागणी रंगधामपेठा चेक येथील गावकऱ्यांनी तहसीलदार, सिरोंचा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, सिरोंचा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनानुसार, सदर शासकीय शेतरस्ता सर्वे क्रमांक १६९ पासून सुरू होऊन सर्वे क्रमांक १७३ पर्यंत अस्तित्वात आहे. मात्र सर्वे क्रमांक १०२ पासून सदर रस्ता लोखंडी काटेरी तारांचे कुंपण लावून पूर्णपणे अतिक्रमित करण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.रस्ता बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टरने नांगरणी, पेरणी, कापणी तसेच धान्य व शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी इतरांच्या शेतातून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होत असून वारंवार वाद निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच बैल, गाय, म्हैस, शेळी आदी जनावरांना चराईसाठी नेतानाही अडचणी निर्माण होत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.काही जमीनधारकांनी सदर जमीन पूर्वीच्या मालकांकडून खरेदी केली असून रस्ता अनेक वर्षांपासून अतिक्रमित असल्याची माहिती नसल्याची शक्यता असल्याने, महसूल विभागामार्फत प्रत्यक्ष मोजणी केल्यानंतर रस्ता त्यांच्या जमिनीतून जात असल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधितांनी स्वेच्छेने रस्ता खुला करावा. मात्र रस्ता खुला करण्यास नकार देणाऱ्या किंवा अडथळा निर्माण करणाऱ्यांवर नियमानुसार अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.यासाठी महसूल अभिलेख, गाव बंधोबस्त नकाशा तसेच सन १९९९ च्या प्रक्षेपणाचा गाव नकाशा यानुसार तात्काळ प्रत्यक्ष स्थळ पाहणी व मोजणी करून सर्वे क्रमांक १०२ पासून सर्वे क्रमांक ५७ व ९३ व सर्वे क्रमांक ६४ व ६५ च्या शेवटपर्यंत असलेल्या शासकीय शेतरस्त्याची हद्द निश्चित करून तो अतिक्रमणमुक्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.या निवेदनावर सुजित चौधरी, कटला प्रवीण , कटला पवन , राजशेखर देनाबोईना, गंगाधर देनाबोईना, सुरज चौधरी, माल्लेश सल्ला, नागराज लाटकरी, पवन देनाबोईना, श्रीनिवास वानममुला , जनगम दक्षमूर्थी आणि कार्तिक पोहापरे आदी गावकऱ्यांच्या उपस्थिती होते निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी गडचिरोली, पोलीस अधीक्षक गडचिरोली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (महसूल), अहेरी यांना माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी देण्यात आल्या आहेत.गावकऱ्यांनी प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष मोजणी करावी आणि शेतकऱ्यांचा पारंपरिक शासकीय शेतरस्ता अतिक्रमणमुक्त करून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.







