सिरोंचा : सिरोंचा शहरात पावसाळ्यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांची भीती असतानाही नगरपंचायत प्रशासनाकडून नियमित फॉगिंग व आवश्यक स्वच्छता उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.या संदर्भात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन शहरात तातडीने फॉगिंग, ब्लीचिंग पावडरची फवारणी आणि स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी केली आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी शहरात नियमित धूर फवारणी सुरू झालेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.सध्या श्रावण महिना सुरू असल्याने प्रभू श्रीराम मंदिर, श्री विठ्ठलेश्वर मंदिर, श्री बालाजी मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, हनुमान मंदिर, पोचम्मा मंदिर तसेच दर्गा परिसरात नागरिक व महिलांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे या धार्मिक स्थळांच्या परिसरात तातडीने स्वच्छता करून ब्लीचिंग पावडरची फवारणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून यापूर्वीही नागरिकांनी डासांच्या समस्येकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला; मात्र अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.‘मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन’प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास नागरिकांकडून नगरपंचायतीच्या नावाने भीक मागून निधी जमा करण्यात येईल. त्या पैशातून ब्लीचिंग पावडर खरेदी करून लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ती टाकण्यात येईल आणि त्यांच्या परिसरात नागरिक स्वतः फॉगिंग करून निषेध नोंदवतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन नगरपंचायत प्रशासनाने विलंब न करता संपूर्ण शहरात नियमित फॉगिंग, ब्लीचिंग पावडर फवारणी व स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.त्यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सतीश जवाजी, काँग्रेस नेते रवी सल्लम आदी कार्यकर्ते उपस्थित होते







