डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपंचायतीची मोहीम; डम्पिंग परिसराच्या स्वच्छतेलाही वेग
प्रतिनिधी – सागर मूलकला. सिरोंचा
सिरोंचा : शहरात मागील काही दिवसांपासून वाढलेल्या डासांच्या प्रादुर्भावाची दखल घेत अखेर सिरोंचा नगरपंचायतीकडून फॉगिंग मशीनद्वारे धूरफवारणीला सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन नगराध्यक्ष पद्माताई भोगे यांनी फॉगिंग सुरू करण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यानंतर तांत्रिक अडचण दूर होताच शहरातील विविध भागांत फॉगिंगची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.मागील सुमारे वीस दिवसांपासून नगराध्यक्ष पद्माताई भोगे यांनी शहरातील वाढत्या डासांच्या प्रादुर्भावाबाबत मुख्याधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. शहरात नियमित फॉगिंग करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र, नगरपंचायतीच्या फॉगिंग मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रत्यक्ष फवारणीला विलंब झाला. अखेर तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर नगरपंचायतीने फॉगिंग मोहीम सुरू केली आहे.दरम्यान, शहरातील डम्पिंग परिसराची नगराध्यक्ष पद्माताई भोगे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तेथील परिस्थितीची माहिती घेतली. डम्पिंगच्या ठिकाणी साचलेला कचरा व अस्वच्छतेमुळे डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने साफसफाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर प्रशासनाकडून डम्पिंग परिसरातील स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले.
फॉगिंगच्या श्रेयावरून राजकीय चर्चा
शहरातील डासांच्या प्रश्नावर काही विरोधकांकडून निवेदन देऊन फॉगिंगची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे फॉगिंगच्या श्रेयावरून स्थानिक राजकारणात चर्चा सुरू झाली आहे. मात्र, नगराध्यक्ष पद्माताई भोगे यांच्या म्हणण्यानुसार, विरोधकांकडून निवेदन देण्यापूर्वीच प्रशासनाला फॉगिंगबाबत सूचना करण्यात आल्या होत्या.“नागरिकांच्या प्रश्नांसाठी कोणत्याही माध्यमातून मागणी होत असेल तर त्याचे स्वागतच आहे. मात्र, नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न कोणत्याही राजकीय वादाचा विषय न बनवता सर्वांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे,” अशी भूमिका नगराध्यक्ष पद्माताई भोगे यांनी व्यक्त केली.पदभार स्वीकारल्यापासून शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य आणि इतर मूलभूत सुविधांबाबत प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांना गती देण्यावर भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उर्वरित कार्यकाळात मूलभूत सुविधांवर भर
नगरपंचायतीच्या उर्वरित सुमारे पाच महिन्यांच्या कालावधीत शहरातील नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य आणि इतर नागरी समस्यांवर प्रशासनासोबत समन्वय साधून कामांना गती देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.फॉगिंग फवारणी सुरू झाल्याने शहरातील नागरिकांना डासांच्या वाढत्या प्रादुर्भावापासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पुढील काळातही शहरातील स्वच्छता व आरोग्याच्या प्रश्नांवर सातत्याने उपाययोजना राबविण्याची गरज आहे.







