सिरोंचा : तालुक्यातील आशा स्वयंसेविका पदभरती प्रक्रियेमध्ये गंभीर अनियमितता व आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप करत भरती प्रक्रिया तात्काळ रद्द करून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत आनंदराव एम. कुम्मारी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, दिनांक 12 मार्च 2026 रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय सिरोंचा येथे आशा स्वयंसेविका पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या. मात्र या निवड प्रक्रियेत शैक्षणिक गुणवत्ता व मुलाखतीत पारदर्शकता न ठेवता सरळ अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.मुत्तापूर माल येथील ललिता भास्कर कुम्मारी हिचे शिक्षण इयत्ता दहावीपर्यंत असून तिला केवळ 53 टक्के गुण आहेत. तसेच अर्ज भरताना देखील तिला शैक्षणिक तपशील व्यवस्थित नमूद करता आला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुसरीकडे रवली आनंदराव कुम्मारी हिला दहावीमध्ये 69 टक्के गुण असून ती महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोक्रा) 2.0 अंतर्गत 24 मे 2025 पासून काम करत आहे. गावसभा घेणे, गाव नकाशा तयार करणे, कृषी अधिकाऱ्यांना मदत करणे अशा विविध कामांचा अनुभव असूनही तिचे नाव अंतिम यादीत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.तसेच निवड झालेल्या उमेदवाराने धर्मांतर केल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला असून त्याबाबत गावकऱ्यांच्या स्वाक्षरीसह पोलिस पाटील यांच्या माध्यमातून तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना तक्रार देण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे. मात्र यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.या भरती प्रक्रियेदरम्यान काही अधिकाऱ्यांनी अर्जदारांकडून आर्थिक व्यवहार केल्याचे ध्वनिमुद्रण (साऊंड रेकॉर्डिंग) उपलब्ध असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. त्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रिया पैशाच्या जोरावर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर आशा स्वयंसेविका भरती प्रक्रिया तात्काळ रद्द करून उच्चस्तरीय सखोल चौकशी करण्यात यावी तसेच गैरप्रकारात सहभागी असलेल्या आशा निवड समितीवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन शिवाय पर्याय नाही अशी मागणी तक्रारदार आनंदराव एम. कुम्मारी यांनी केली आहे.







