सिरोंचा : तालुक्यातील बोरमपल्ली (प्राथमिक आरोग्य केंद्र टेकडा) येथे झालेल्या आशा स्वयंसेविका पदभरती प्रक्रियेत अटी व नियमांचे उल्लंघन करून अपात्र उमेदवाराला संधी देण्यात आल्याचा आरोप करत स्थानिक रहिवासी श्रीमती शारदा रवींद्र कडार्ला यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. या संदर्भात तहसीलदार सिरोंचा यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले असून भरती प्रक्रियेचा पुनर्विचार करून न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, श्रीमती शारदा कडार्ला या बोरमपल्ली येथील रहिवासी असून त्यांचा विवाह १८ जून २०२१ रोजी झाला होता. मात्र २८ डिसेंबर २०२३ रोजी त्यांच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला. त्या वेळी त्या पाच महिन्यांच्या गर्भवती होत्या. सासरी अत्यंत हालाखीची परिस्थिती असल्याने त्यांना माहेरी परतावे लागले. सध्या त्यांच्यावर लहान मुलाच्या पालनपोषणाची जबाबदारी असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या आशा स्वयंसेविका भरती प्रक्रियेत त्यांनी अर्ज केला होता. यापूर्वी २०२५ मधील भरतीत त्यांची निवड होऊन आदेश (क्रमांक ३६६/२०२५) सुद्धा मिळाला होता, मात्र ती भरती नंतर रद्द करण्यात आली. त्यानंतर १२ मार्च २०२६ रोजी नव्याने मुलाखत घेण्यात आली. मात्र या वेळी त्यांची निवड न करता दुसऱ्या महिलेला प्राधान्य देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.सदर भरती प्रक्रिया रद्द करून पुन्हा नव्याने संधी देण्यात यावी, अशी मागणी श्रीमती कडार्ला यांनी केली आहे. तसेच या प्रकरणात न्याय न मिळाल्यास सिरोंचा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.(बॉक्स)“मी एक निराधार विधवा असून माझ्यावर लहान मुलाच्या संगोपनाची जबाबदारी आहे. आशा स्वयंसेविका पदासाठी मला न्याय मिळावा व भरती प्रक्रियेचा पुनर्विचार करण्यात यावा,” अशी मागणी श्रीमती शारदा रवींद्र कडार्ला यांनी केली आहे.






