सिरोंचा (ता. 28 मार्च 2026) : अहेरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय नेते, विद्यमान आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांचा सिरोंचा तालुक्यात दोन दिवसीय दौरा आयोजित करण्यात आला असून, या दौऱ्यात विविध विकासकामांना गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दौऱ्याची सुरुवात 29 मार्च रोजी अंकीसा येथे होणार आहे. येथे सकाळी 9 वाजता नव्याने उभारण्यात येणाऱ्या प्राथमिक आरोग्य पथकाच्या निवासस्थानाचे भूमिपूजन आत्राम यांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना आरोग्य सुविधा अधिक सक्षम व तत्परतेने उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. यानंतर ते कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन स्थानिक प्रश्न, जनतेच्या अडचणी व विकासकामांचा आढावा घेणार आहेत.त्यानंतर असररेल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संघटन बळकटीकरण, आगामी राजकीय नियोजन आणि स्थानिक घडामोडींवर चर्चा होणार आहे.30 मार्च रोजी सिरोंचा तहसील कार्यालयात शासकीय आढावा बैठक पार पडणार असून, विविध विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. प्रलंबित विकासकामे, जनतेच्या समस्या आणि उपाययोजना यावरही चर्चा अपेक्षित आहे. यानंतर निवासस्थानी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन आगामी जिल्हा परिषद, ग्रामपंचायत व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले जाणार आहे.दरम्यान, रंगय्यापल्ली येथे सकाळी 11 वाजता जमिनीचे पट्टे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, त्याचवेळी युवकांसाठी क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटनही करण्यात येणार आहे.हा दौरा केवळ राजकीय नसून, विकासकामांना चालना देणे, जनतेच्या समस्या जाणून घेणे आणि कार्यकर्त्यांना दिशा देणे या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी यांनी सांगितले. त्यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.







