सागर मूलकला, संपादक
सिरोंचा (ता. 29) : सिरोंचा – धर्मापुरी मार्गावर आज संध्याकाळच्या सुमारास झालेल्या भीषण दुचाकी अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नगरम गावातील रहिवासी राजाराम आरिगेला यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. तर नंदीगाव येथील रोहन सिडाम आणि पुसुकपल्ली गावातील अरुण तोर्रम हे दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत. समोरासमोर दुचाकींची जोरदार धडक झाल्याने हा अपघात घडला.
ही घटना सिरोंचा – धर्मापुरी मार्गावरील प्राणहिता हॉटेलसमोर तसेच परिसरातील इतर काही ठिकाणी नव्याने करण्यात आलेल्या रस्त्याच्या बांधकामामुळे घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. संबंधित ठेकेदारांनी रस्त्याचे काम करताना काही ठिकाणी रस्ता उंच करण्यात आल्याने, विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना योग्य अंदाज येत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढत असल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार आहे.
अपघातातील जखमींना पोलिसांच्या मदतीने तात्काळ सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या घटनेचा पुढील तपास सिरोंचा उपविभागीय पोलीस अधिकारी संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रभारी नांदे व त्यांच्या पथकाकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या मार्गावरील धोकादायक ठिकाणांची तात्काळ दुरुस्ती करून योग्य सूचना फलक व प्रकाशयोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.







