सिरोंचा : सिरोंचा–धर्मापुरी (कलेश्वर) मार्गावर नव्याने करण्यात आलेल्या रस्त्याच्या बांधकामातील धोकादायक उंचवट्यांमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. प्राणहिता हॉटेल परिसर, चिंतालपल्ली गावाजवळ तसेच नगर पंचायत परिसरातील महामार्गावर अनेक ठिकाणी उंचवटे असल्याने वाहनचालकांना विशेषतः रात्रीच्या वेळी अडचणींचा सामना करावा लागत असून अपघातांची शक्यता वाढली आहे.अलीकडेच याच मार्गावर झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्याच्या बांधकामात ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा झाल्याचा आरोपही करण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे सिरोंचा तालुकाध्यक्ष सागर मूलकला यांनी प्रशासनाकडे ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच धोकादायक उंचवटे तात्काळ दूर करून आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक व प्रकाशयोजना करण्यात यावी, अशीही त्यांनी मागणी केली आहे.यासोबतच अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना किमान २० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी व जखमींना योग्य उपचारासाठी मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.दरम्यान, निष्काळजी ठेकेदारांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत असून अपघातग्रस्त कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी होत आहे.







